पृथ्वीचे रक्षक

निसर्ग व पर्यावरणविषयक अनेक भल्या - बुऱ्या गोष्टी आपल्या अवती - भवती घडत असतात. नैसर्गिक आपत्ती सोडल्यास बहुतांशवेळा मानवाचा पर्यावरणातील हस्तक्षेप त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरतो . आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी हे विषय निगडित असले तरी ते आपल्यापर्यंत पोहोचतातच असे नाही. या विषयांना वाहिलेली काही मोजकी इंग्रजी नियतकालिकं आपल्याकडे जरी प्रसिद्ध होत असली तरी त्यांची पोहोच या क्षेत्राशी निगडित एका मर्यादित वर्गापर्यंतच सीमित राहते.

 गेल्या नऊ वर्षाहून अधिक काळापासून 'हिरवं वाचनया सदरातून अशा इंग्रजी  नियतकालिकांतील पर्यावरणविषयक लेखांचा सटीक परिचय करून दिला जातो. निसर्गस्नेही जीवनशैली आणि पर्यावरणस्नेही विकासनीती ह्यांचा पुरस्कार करणारं व त्या दृष्टीने विचार आणि कृती कार्यक्रम पुढे ठेवणाऱ्या 'गतिमान संतुलन' या मासिकात हे सदर नियमित प्रसिद्ध होते.  गतिमान संतुलन मासिकाच्या संपादकांच्या पूर्व परवानगीने ते लेख ब्लॉगवर प्रसिद्ध होतात. 

 

पृथ्वीचे रक्षक 

मागील दोन वर्षात SARS-CoV-2 हा विषाणू नवनवे अवतार घेऊन अखिल मानव जातीला आव्हान देत असतांना मनुष्याच्याच अविवेकी कृत्यांमुळे मनुष्येतर सजीव देखील सहअस्तित्वाची लढाई सातत्याने गेली अनेक दशके लढत आहे. चोहोबाजूंनी नैराश्याची भावना दाटून येत असतांना अशाही परिस्थितीत कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या “… तुम्ही फक्त लढा म्हणा” या काव्य पंक्तींना स्मरून खिंड लढवणारे अनेक शिलेदार वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या आतल्या आवाजाचा कौल मानून व्रतस्थ कार्य करत असतात. मनुष्य जातीसाठी लढणारे अनेक लढवय्ये जसे समाजात आहेत तसेच मनुष्येतर सजीवांसाठी लढणारे एकांडे शिलेदारही आपापल्या ठिकाणी आपले बहुमोल योगदान देत आहेत. २०२१ सरतासारता अशा सजीवांसाठी प्राणपणाने लढणाऱ्या वीरांच्या ‘पाठीवरती हात’ ठेवणाऱ्या ‘Sanctuary Wildlife Service Awards’ ची घोषणा Sanctuary Foundation तर्फे नुकतीच जाहीर झाली. देशभरात या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींपैकी जे १२ जण या पुरस्काराने सन्मानित केले गेले अशा मानकऱ्यांची ओळख “Honouring Earth Defenders” या लेखाद्वारे Sanctuary Asia द्वैमासिकाच्या डिसेंबर २०२१ अंकातून करून दिली आहे. अंधक्कारमय पर्यावरणीय भविष्यापासून वाचवण्याची आस असलेले आणि वेगवेगळ्या भौगोलिक आसमंतात निस्पृहपणे कार्य करणाऱ्या या समर्पित वीरांची ही ओळख. 

डॉ अन्वरुद्दीन चौधरी, निवृत्त सनदी अधिकारी, वन्यजीव अभ्यासक - संरक्षक आणि लेखक : १९५९ मध्ये मेघालयातील शिलाँग येथे जन्मलेल्या अन्वरुद्दीन चौधरी यांनी जवळपास चार दशकं ईशान्य भारतातील नैसर्गिक परिसंस्थांचे दस्तऐवजीकरण आणि संरक्षण कार्यात व्यतीत केली आहेत. सुरवातीला आसाम राज्यसेवेत कार्यरत असलेले डॉ चौधरी पुढे भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. भारताच्या पूर्व हिमालय भागातल्या प्राणी आणि पक्षी जीवनाचा त्यांचा सखोल अभ्यास असून लेखन आणि छायाचित्रणाद्वारे अनेक जनजागृती कार्यक्रम त्यांनी आयोजित केले आहेत. ते एक उत्तम कलाकार म्हणूनही त्या भागात ज्ञात आहेत.

शासकीय सेवेतील कार्यकाळात अनेक पदे सांभाळतांना त्यांनी जैवविविधतेतील महत्त्वाच्या अधिवासांचे संवर्धन करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज ईशान्य भागातील किमान १३ वन्यजीव अभयारण्ये आणि हत्तींसाठीचे दोन राखीव क्षेत्रे निर्माण झाली आहेत. White-winged Wood Duck या पक्ष्याला आसाम राज्याचा राज्यपक्षी घोषित करण्यात जसा त्यांचा मोठा वाटा आहे तसेच काही वन्य प्रजातींचा शोध त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे, ज्याची माहिती लेखात दिली आहे. या क्षेत्रातल्या योगदानामुळे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे मानद सभासदत्व त्यांना बहाल केले गेले आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवावर आधारित २८ पुस्तकं लिहिली असून ९०० हुन अधिक संशोधनपर लेख त्यांच्या नावे प्रकाशित झाले आहेत. या वर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित असलेले डॉ चौधरी, संवर्धन कार्यात योगदान देऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुण निसर्गवाद्यांचे प्रेरणास्थान आहेत. 

‘वन्यजीव सेवा पुरस्कारा’ने सन्मानित डॉ. रविकांत खोब्रागडे आणि प्राजक्ता हुशंगाबादकर हे दोघे महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित असून, त्यांना हा पुरस्कार विभागून दिला गेला आहे. असामान्य धैर्य दाखवत इतरांना अनुसरण करण्यासाठी उच्च मानके स्वतःच्या उदाहरणातून समोर ठेवणाऱ्या व्यक्तींसाठी दिला जाणारा हा पुरस्कार. व्रतस्थ आणि समर्पित वृत्तीने तरीही प्रसिद्धी पासून दूर असे या दोघांचेही कार्य आहे. डॉ. खोब्रागडे हे ताडोबा-अंधारी येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर प्राजक्ता हुशंगाबादकर या वन्यजीव जीवशास्त्रज्ञ म्हणून याच व्याघ्रप्रकल्पात काम करतात. डॉ खोब्रागडे हे केवळ तांत्रिक कौशल्य असलेले निष्णात पशुवैद्यकच आहेत असं नसून करुणा आणि समर्पणवृत्तीने कार्य करणारे संवेदनशील व्यक्ती आहेत. वन्य प्राणी आणि स्थानिक लोकं या दोघांच्याही जीवाचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापर्यंत, तसेच मानव - वन्यप्राणी संघर्ष टाळून परस्पर सहजीवन प्रस्थापित करण्यावर त्यांचा विशेष भर असतो. तर प्राजक्ता या केवळ प्रयोगशाळेच्या सुखासीन आवरणात काम करणाऱ्या जीवशास्त्रज्ञ नसून प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात वन विभाग, वन्यजीव अभ्यासक आणि स्थानिक समुदायांच्या बरोबरीने वन्यजीवांसाठी वास्तवदर्शी कार्य करत आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले अनेक प्रबंध हा तर त्यांच्या व्यावसायिक कार्याचा भाग आहेच पण गावकऱ्यांशी सल्लामसलत करून संघर्ष व्यवस्थापनात नवनवीन प्रयोग करत त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास “शेवटच्या श्वासापर्यंत वन्यजीवांचे संरक्षण करणे” हे त्यांचे खरे जीवितकार्य आहे. 

एखाद्या गोष्टीच्या संरक्षणार्थ जीवाची बाजी लावण्याची उर्मी जागृत होण्यासाठी कधीकधी आपण काय ओरबाडले आहे याची आंतरिक जाणीव होणे आवश्यक ठरते.  ‘समुदाय संरक्षक’ या विभागात दिला गेलेला पुरस्कार याची साक्ष आहे.  नागालँडच्या ‘फकीम वन्यजीव अभयारण्य’ क्षेत्रात कार्य करणाऱ्या आणि ‘समुदाय संरक्षक’ पुरस्काराने सन्मानित ‘फकीम शिकारविरोधी पथका’ च्या गटाचे वैशिष्ठ्य हे की यातील बहुतांश मंडळी पूर्वाश्रमीचे शिकारी आहेत. या गटातील सातही जण खरे तर परंपरेनुसार पिढीजात शिकारी. पूर्वी अटळ असणारी गोष्ट आता बदलली पाहिजे याची जाणीव झालेल्या अलेम्बा ने मग त्याच्या साथीदारांनाही शिकारीपासून प्ररावृत्त करून वन्यजीव संरक्षणाचा ध्यास घेतला. हे पथक संवर्धन क्षेत्रात वन्यप्राण्यांचे सर्वेक्षण करणे, वनक्षेत्र परिसरात गस्त घालणे, बेकायदेशीर कृत्य होत असल्यास कारवाई करण्यास मदत करणे, संशोधकांना माहितीसाठी तसेच वनस्पती आणि जीवजंतूंची स्थिती आणि त्यांचे दस्तऐवजीकरण करणे अशा विविध उपक्रमात या गटाचा मोठा सहभाग असतो. आपला वारसा आणि नैसर्गिक साधन संपत्ती धोक्यात आली तर स्थानिक समुदाय सर्वोत्तम रक्षक कसे बनू शकतात याचे हे पथक एक खणखणीत उदाहरण आहे.

‘हरित पत्रकारिता’ या विभागात निवड झालेल्या मध्यप्रदेश राज्यातील अरुण सिंग यांची निवड ही निर्भय पत्रकारिता कशी असू शकते याचे उत्तम उदाहरण आहे. पेशाने पत्रकार असलेले अरुण सिंग हाडाचे निसर्गप्रेमी आणि रक्षक आहेत. ते त्यांच्या राज्यातील संवर्धनाच्या समस्यांवर सातत्याने प्रकाश टाकत असतात आणि मध्य भारतीय भागातील लोकांपर्यंत संवर्धन शिक्षणाचा प्रसार करत असतात. सर्वात उपेक्षित समाजाच्या, लोकांच्या व्यथेला ते वाचा फोडतात.  संसाधने कमी झाल्यामुळे त्यांना भेडसावणारे प्रश्न, त्यांना होणारे त्रास, कुपोषण आणि संभाव्य हवामान बदलामुळे निर्वासितांचे होऊ घातलेले अंतर्गत स्थलांतर याविषयी ते हिंदीत, स्थानिकांना कळेल अशा भाषेत लिहितात. आज त्यांचा आवाज या भागातल्या सर्वात विश्वासार्ह आवाजांपैकी एक बनला आहे. गेल्या पाव शतकापासून, त्यांनी सातत्याने छुपी वस्तुस्थिती उघड करत नैसर्गिक संसाधनातून नफा मिळवण्यासाठी काम करणाऱ्या लॉबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रस्तावित केन-बेतवा नदीजोड प्रकल्पामुळे होऊ घातलेल्या पर्यावरणीय गोंधळावर सातत्याने प्रहार करणे हे जसे एकीकडे त्यांनी केले त्याचप्रमाणे पन्नामध्ये वाघांच्या यशस्वी पुनरुत्थानाबद्दल सरकारने केलेल्या कार्याचे कौतुक देखील तितक्याच आत्मीयतेने केले आहे. सिंग यांची अथक लढाई आहे वंचितांच्या शोषणाविरुद्ध जी त्यांच्या शब्दांची धार बोथट होऊ देण्यास नकार देते. 

कोरोना साथीमुळे जग टाळेबंदी मध्ये गेले असतांना गोव्यामध्ये सरकारने घाईघाईने काही निर्णय घेतले. आभासी बैठकीच्या माध्यमातून (व्हर्च्युअल क्लीयरन्सच्या) तेथे तीन समांतर अशा पायाभूत सुविधा प्रकल्पांना मान्यता दिली गेली - ती होती; रेल्वे लाईन, ट्रान्समिशन लाईन आणि हायवे. हे सर्व प्रकल्प मोलेम राष्ट्रीय उद्यानाला उभा छेद देणाऱ्या होत्या.  मोलेम नॅशनल पार्क बरोबरच त्याला जोडून असलेले भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य गोवेकरांच्या दृष्टीने  केवळ एक सांस्कृतिक ठेवाच आहे असा नाही तर त्यांच्या पाण्याच्या सुरक्षेसाठी देखील हे महत्त्वाचे स्रोत आहेत. अशा प्रकारे घाईघाईने निर्णय झाल्याचे लक्षात आल्यावर  गोव्यातील लोकांना धक्काच बसला. पुढे जे झाले ते होते एक स्वप्न, एक आवाज आणि एक लोकचळवळ! शांत अन संयमी अशा सामान्य गोवावासीयांनी मग या विनाशी निर्णयाला एकत्र येऊन विरोध केला. ज्यामध्ये होते – विद्यार्थी, डॉक्टर, वकील, मच्छीमार, वास्तुविशारद, हॉटेलवाले, लहान व्यवसाय मालक, शिक्षक, शेतकरी, कलाकार आणि शास्त्रज्ञ.  याचिका आणि ऑनलाइन चर्चेद्वारे यावर तिथे बरीच घुसळण झाली. सर्व गोवेकर स्वयंस्फूर्तपणे याच्या सुनावणी दरम्यान तसेच रॅली आणि फ्लॅश मॉब आयोजनातून एकत्रित होऊ लागले. सर्वसामान्य लोकांकडून निर्माण झालेल्या गाणी, कथा आणि कला अशा सर्जनशील माध्यमातून त्यांच्यामध्ये एकजूट निर्माण झाली आहे. ‘आमचे मोलेम’ चळवळीला सातत्याने समर्थन वाढत गेले. पुढे मग सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय पथक नियुक्त केले. त्यानंतर स्थापन झालेल्या अधिकारप्राप्त समितीने या प्रकल्पांच्या फेरतपासणीचे आदेश दिले. त्यानुसार समितीने तीन प्रकल्पांपैकी, एक प्रकल्प मागे घेण्याची शिफारस केली तर अन्य दोघांमध्ये सुधारित आराखडे सादर करण्याचे आदेश दिले. अर्थातच ‘आमचे मोलेम’ चळवळीला मिळाला या वर्षीचा  हरित लोकचळवळ पुरस्कार. ‘आमचे मोलेम’ ही मोहीम सामूहिक शक्तीचे एक मूर्तिमंत प्रतीक आहे. लोकसहभागातून जेव्हा एखादी चळवळ उभी राहते तेव्हा तिचे काय फलित असू शकते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. 

हिमालयाच्या पर्वत रांगा पर्वतारोही सोडून इतरांनाही कशा संमोहित करतात याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सिक्कीम राज्यातल्या निसर्गवादी संशोधक उषा लाचुंगपा. संवर्धनाच्या प्रखर ध्येयवादाने झपाटून गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या उषा आजही त्याच तडफेने प्रशासन आणि स्थानिकांमधल्या दुवा ठरल्या आहेत. निसर्ग संवर्धक व संशोधक या पुरस्काराने सन्मानित उषा लाचुंगपा यांचा प्रवास सुरु झाला तो मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (BNHS) जीवशास्त्राच्या विद्यार्थिनी म्हणून. BNHS मधील दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्यावर पुढे त्यांनी डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेमधून (Wildlife Institute of India - WII) अतिशय कठीण अशा वन्यजीव व्यवस्थापन आणि संशोधन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन या विषयात भारतातील पहिल्या महिला ठरल्या तसेच वनखात्याव्यतिरिक्त ही पदवी संपादन करणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्या. अंतर्बाह्य निसर्गवादी असलेल्या उषा यांनी गेली तीन दशके सिक्कीम वन विभाग, पर्यावरण आणि वन्यजीवांच्या व्यवस्थापन विषयात समर्पित कार्य केले आहे. त्या राज्यातल्या अनेक दुर्लभ प्रजातींचे शोध त्यांच्या नावावर जमा आहेत. सेवानिवृत्तीनंतरही त्या विविध संस्थांच्या माध्यमातून आजही कार्यरत आहेत. हिमालयातील निसर्गसंपदेच्या संरक्षणासाठी आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थां तसेच नागरिकांमधील त्या प्रमुख समन्वयक आहेत. 

सँक्च्युरी वाईल्डलाईफ अवॉर्ड च्या तरुण निसर्गवादी या विभागात आयुषी जैन आणि रम्या नायर या दोघींना सन्मानित केले गेले आहे. आयुषी जैन ही समुदाय संवर्धन या विषयातील संशोधक आणि विद्यार्थी आहे. उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी असलेली आयुषी केरळ मध्ये कासवाच्या एका अत्यंत दुर्मिळ प्रजातीवर संशोधन करत आहे जेणेकरून त्याला संरक्षण देऊन ती प्रजाती लुप्त होण्यापासून वाचवता येईल. अनेक स्थानिक व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीने ती तिथल्या पायस्विनी आणि चंद्रगिरी नदीच्या खोऱ्यात Cantor’s Giant Softshell Turtle या आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अधिवासाविषयी संशोधन करत आहे. एकीकडे उत्तरेतली आयुषी दक्षिणेत काम करत असतांना तिची समकालीन रम्या नायर जी मानववंशशास्त्रज्ञ संशोधक आणि संवर्धनवादी अभ्यासक, थेट पूर्वोत्तर भागात नागालँड मध्ये आपल्या देशाच्या वारसा संवर्धनावर काम करत आहे. रम्या, नागालँडच्या थनामीर गावातील समुदायाची जणू सदस्यच झाली आहे. तिथल्या तीन - तीन स्थानिक बोली भाषा शिकून त्यांच्यातीलच एक झाली आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया आणि तिच्या सहयोगी चमूबरोबर व्यापक स्तरावर त्या भागाचे सर्वेक्षण आणि स्थानिक यिमखियुंग या नागा समुदायाबरोबर समन्वय साधून दुर्गम भागातील जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करते. तसेच शून्याखालील तापमानात अति उताराच्या भूप्रदेशात कॅमेरा सापळे लावणे, ग्राम परिषदेमार्फत  वनौपज आदींबाबत स्थानिकांना अधिकार आणि संवर्धनात सक्षम करणे आदी विविधांगी कार्य ती करत आहे. या प्रकल्पाच्या आधी रम्याने वन्यजीव संरक्षण संस्थेद्वारे (WCS) केल्या गेलेल्या संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व केले होते. डॉ विद्या अत्रेय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रकल्पात मार्जर कुळातील वाघ - बिबटे आदी मोठे प्राणी आणि मानवी संबंध याचा अभ्यास केला गेला, ज्यामध्ये मुख्यतः महाराष्ट्रातील वारली समाजाचा समावेश होता. आयुषी आणि रम्या सारख्या आश्वासक युवती वन्यजीव, समुदाय आणि परिसंस्था यांचा समतोल राखण्यासाठी करत असलेले कार्य त्यांच्याच पिढीतील इतरांना नक्कीच स्फूर्ती देणारे आहे. 

शतकानुशतके निसर्गाची जपणूक करणारा समाज म्हणून ज्याची ख्याती आहे अशा बिष्णोई समाजातील राधेश्याम बिश्नोई यांना प्राण्यांचा रक्षणकर्ता आणि छायाचित्रकारितेसाठी असलेल्या वन्यजीव संरक्षक या पुरस्काराने गौरविले गेले आहे. जैसलमेर मरुभूमीतील भूमिपुत्र असलेले राधेश्याम यांना स्वाभाविकपणे जसे अजाणतेपणी निसर्गरक्षणाचे धडे मिळाले तसेच जखमी प्राण्यांची सेवा - शुश्रूषा करणे याची लहानपणापासूनच उत्पन्न झालेली आवड पुढे पशुवैद्यकीय क्षेत्रातले साहाय्यक म्हणून काम करतांना कामी आली. जोधपूर रेस्क्यू सेन्टर मध्ये काम करता करता त्यांना हर तऱ्हेच्या प्राणी - पक्ष्यांची शुश्रूषा करतांना वन्य सजीवांशी घट्ट मैत्री निर्माण झाली. त्याचबरोबर या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांचा लाभलेला सहवास त्यांना ज्ञानसमृद्ध करत गेला. माळढोक पक्षी आज त्याच्या अस्तित्वाची शेवटची लढाई लढत आहे. राजस्थानचा प्रदेश या पक्ष्याचे आता एकमेव आश्रय आणि आशास्थान उरले आहे.  याची जाणीव असलेले राधेश्याम यांनी आता त्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. पोखरण भागात त्यांनी स्थानिकांच्या मदतीने एक संगठन स्थापित केले आहे. तसेच Ecology, Rural Development and Sustainability Foundation या संस्थेद्वारे त्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करत आहेत. चिंकारा, माळढोक आणि गिधाड यांच्या संरक्षणावर त्यांचा भर आहे. छायाचित्रण हे जसे ते छंदासाठी करतात तसेच दस्तऐवजीकरणातही त्याचा त्यांना मोठाच फायदा होतो. मरुभूमीचा आसमंत जपण्याचा वसा घेतलेले राधेश्याम एक आश्वासक निसर्गप्रेमी आहेत.


चांगला शिक्षक हा नेहमीच चांगला विद्यार्थी असतो आणि युवान हा या उक्तीचा पुरावा आहे. युवान एवेस, एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व, ज्यांना हरित शिक्षक पुरस्काराने यावर्षी सन्मानित केले गेले. शिक्षण क्षेत्रात तर त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहेच पण त्याच बरोबर ते लेखक आणि क्रियाशील कार्यकर्ते देखील आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली. "शिकणे, करणे, शिकवणे आणि जगणे" या दरम्यान असलेल्या अस्पष्ट सीमा त्यांनी सहजतेने पार केल्या. कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या पाठशाळेत त्यांचे जन्मजात असलेले कुतूहल नैसर्गिकरित्या फुलले. सध्या ते शाळेच्या शेती आणि पर्यावरण विभागाचे समन्वयक आहेत. निसर्ग-केंद्रित आणि बाल-केंद्रित अभ्यासक्रम आणि कौशल्य विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे जो आज भारतातील पर्यायी शैक्षणिक संस्थामध्ये लोकप्रिय झाला आहे. ते जे-जे उपदेश करतात ते-ते उत्साहाने प्रत्यक्षात अमलातही आणतात. तसेच विविध पर्यावरणीय मोहिमांची आखणी आणि समन्वय साधण्यात त्यांचा हिरहिरीने  पुढाकार असतो. त्यांची दोन पुस्तके आणि अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते ज्या सहजतेने या विषयाची घुसळण मुलांच्या भावविश्वाशी करून देतात ती त्यांच्या बालसुलभ औत्सुक्यामुळे साध्य होते याची ग्वाही त्यांचे परिचित देतात. करिष्माई स्वभावाचे शिक्षणतज्ज्ञ युवान हे सँक्च्युरी वाईल्डलाईफ अवॉर्ड चे सर्वात तरुण हरित पुरस्कारप्राप्त शिक्षक आहेत.

याव्यतिरिक्त चिंपांझी वानरांच्या संशोधनावर आयुष्य व्यतीत केलेल्या आणि दंतकथा म्हणून बनून राहिलेल्या जगविख्यात अशा ८७ वर्षीय जेन गुडॉल यांना ‘वन्यजीव आख्यायिका पुरस्कारा’ ने विशेष सन्मानित केले गेले असून त्यांच्यावर एक वेगळा लेखही या अंकात प्रसिद्ध झाला आहे.


Comments

Popular posts from this blog

माणसाने माणसाशी माणसा सम वागणे!

ऑल इज नॉट वेल...