माणसाने माणसाशी माणसा सम वागणे!

  निसर्ग व पर्यावरणविषयक अनेक भल्या - बुऱ्या गोष्टी आपल्या अवती - भवती घडत असतात. नैसर्गिक आपत्ती सोडल्यास बहुतांशवेळा मानवाचा पर्यावरणातील हस्तक्षेप त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरतो . आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी हे विषय निगडित असले तरी ते आपल्यापर्यंत पोहोचतातच असे नाही. या विषयांना वाहिलेली काही मोजकी इंग्रजी नियतकालिकं आपल्याकडे जरी प्रसिद्ध होत असली तरी त्यांची पोहोच या क्षेत्राशी निगडित एका मर्यादित वर्गापर्यंतच सीमित राहते.

 गेल्या पाच वर्षाहून अधिक काळापासून 'हिरवं वाचनया सदरातून अशा इंग्रजी  नियतकालिकांतील पर्यावरणविषयक लेखांचा सटीक परिचय करून दिला जातो. निसर्गस्नेही जीवनशैली आणि पर्यावरणस्नेही विकासनीती ह्यांचा पुरस्कार करणारं व त्या दृष्टीने विचार आणि कृती कार्यक्रम पुढे ठेवणाऱ्या 'गतिमान संतुलन' या मासिकात हे सदर नियमित प्रसिद्ध होते.  गतिमान संतुलन मासिकाच्या संपादकांच्या पूर्व परवानगीने ते लेख ब्लॉगवर प्रसिद्ध होतात. 


माणसाने माणसाशी माणसा सम वागणे!


‘उबुंटू’ हा एक दक्षिण आफ्रिकी भाषेतील शब्द. माणसा - माणसातील परस्पर विश्वास, अनुकंपा, दया, माणुसकी या अर्थाने विशेषत्वाने वापरला जाणारा. इतर सभ्यतांप्रमाणेच आफ्रिकी तत्वज्ञानातून प्रकटलेली परस्पर विश्वास दृढ करणारी ही शिकवण. ‘तुम्ही सर्व आहात म्हणून मी आहे’ हा त्या नीतितत्त्वाचा मतितार्थ. नेल्सन मंडेला, बराक ओबामा, डेसमंड टू टू  अशा जगावर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांनी या संकल्पनेचा वारंवार उच्चार केला. अलीकडे याच नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला. त्यातील ‘माणसाने माणसाशी माणसा सम वागणे …’ ही भावस्पर्शी प्रार्थना त्याच विचारांचे गेय प्रकटीकरण. आज एकविसाव्या शतकातही माणसाला माणूस म्हणून वागवावे याची जिथे विनवणी करावी लागते तिथे माणूस सोडून इतर सजीवांना मानवतेने वागवावे ही अपेक्षा त्यामुळे अवाजवी अशीच. प्रत्यक्षातही परिस्थिती वेगळी नाही याचे विदारक दर्शन घडते Bombay Natural History Society (BNHS) संस्थेच्या ‘Hornbill’ या मुखपत्रातून (जाने - मार्च २०१९). अशी अमानवीय कृत्य उजेडात आणण्यासाठी ‘Trafficking Wildlife’ असा सोळा लेखांचा संपूर्ण विशेषांक काढावा लागतो हे दुर्दैव. गेल्या काही वर्षात सातत्याने विशेषांकाच्या रूपाने अनेक दुर्लक्षित विषय ‘हॉर्नबिल’ ने सर्वसामांन्यांपर्यंत प्रभावीपणे आणले आहेत.


नियतकालिकाच्या पहिल्या पानाच्या सुरवातीलाच “लेखांसाठी वापरलेली छायाचित्र ही बेकायदेशीररीत्या होणाऱ्या वन्यजीवांच्या प्रत्यक्ष तस्करीशी संबंधित असल्याने ती दृश्य त्रासदायक वाटू शकतात व वाचकांनी तारतम्य भावाने बघावी” असा सल्ला छापावा लागतो यावरून एकूणच या विषयातील क्रौर्य अधोरेखित होते. BNHS संस्थेचे संचालक दीपक आपटे आणि  वन्यजीव अभ्यासक व तस्करी विषयाचे जाणकार अब्रार अहमद  या द्वयींनी लिहिलेल्या संपादकीयात ते लिहितात ‘आज आपल्याला बैठकीच्या खोलीत, बसल्याजागी जगाच्या काना-कोपऱ्यात घडणाऱ्या गोष्टींची इत्थ्यंभूत माहिती मिळते पण दुर्दैवाने आपल्या आजूबाजूला काय घडते आहे याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. हीच गोष्ट वन्यजीव तस्करीबाबत. या क्षेत्रातल्या अवैध शिकारी व बेकायदेशीर व्यापार हा त्या-त्या वर्तुळातल्या ‘पार्ट्या’ दरम्यान चालणाऱ्या अनेक निरर्थक गप्पांपैकी एक चविष्ट विषय होतो पण कुठल्याही ठोस कृतीअभावी तिथेच विरून जातो. अस्तित्त्वाच्या धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या प्रजातींची जी आंतरराष्ट्रीय यादी प्रसिद्ध होते त्यामध्ये समाविष्ट असलेल्या अनेक भारतीय वन्यजीवांच्या प्रजाती अनिर्बंधपणे चालणाऱ्या या बेकायदेशीर तस्करीमुळे जगाच्या पाठीवरून समूळ नष्ट होण्याची मोठी भीती आहे. 


भारतीय संस्कृतीमधे  पुरातन काळापासून कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या परिसरातील सजीव व प्राणिमात्रांचे महत्व ओळखून व सहअस्तित्व मान्य करून त्यांचे संरक्षण व संवर्धन हजारो वर्षांपासून केले गेले. मग ते देवी - देवतांचे वाहन या स्वरूपात असेल किंवा नाग पंचमी, बैल पोळा अशा सण  - उत्सवात असेल. आपल्या देशाच्या भौगोलिक वैविध्यामुळे इथली जैवविविधताही समृद्ध आहे. त्यामुळेच बेकायदेशीररीत्या चालणाऱ्या वन्यजीवांच्या तस्करीचे प्रमाणही दुर्दैवाने मोठे आहे. खरं तर स्वातंत्र्योत्तर काळात वन्यजीव संरक्षणाचे कठोर असे कायदे केले गेले जे जगातील सर्वात प्रगत असे मानले जायचे. परंतु त्याची चोख अंमलबजावणी न झाल्यामुळे या क्षेत्रातील अवैध कृत्यांना फारसा आळा बसला नाही. दुर्दैवाने इतक्या वर्षांनंतरही परिस्थितीमध्ये फरक पडला नसून उलट त्यात वाढच झाली आहे. १९७२ सालच्या वन्यजीव (संरक्षण) कायद्यानुसार अधिसूचित केलेल्या परिशिष्ट I ते IV मधील वन्यजीव व परिशिष्ट VI मध्ये प्रतिबंधित वनस्पतींची नोंद आहे. अशा कुठल्याही संरक्षित वन्यजीव व वनस्पती बाळगणे, शिकार वा व्यापार करणे हा गुन्हा असून त्यामध्ये गुन्ह्याच्या स्वरूपात शिक्षेची तरतूद केली आहे. केवळ परिशिष्ट V मधे नमूद केलेल्या प्राणी/पक्षी, ज्यामध्ये  उंदीर, घूस, कावळा, वटवाघूळ, या सारख्या उपद्रवी जीवांच्या शिकारीवर बंदी नाही. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या परराष्ट्र व्यापारांतर्गत येणाऱ्या आयात-निर्यात धोरणानुसार निश्चित केलेल्या नियमांनुसारच वन्यजिवांची/वनस्पतींची वाहतूक संचालित केली जाते. यामध्ये वन्यजीव वा त्यांचे अवयव याच्या आयात-निर्यातीवर बरेच निर्बंध लागू आहेत. असे असले तरी परदेशी वन्यजीवांच्या व्यापारावर देशांतर्गत कुठलेही बंधन नाही. जागतिक स्तरावर देखील यासंबंधी अनेक कायदे व नियंत्रण असले तरी अवैधपणे होणाऱ्या तस्करीची वार्षिक उलाढाल अब्जावधी अमेरिकी डॉलर आहे. ही  व याविषयाशी संबंधित विस्तृत माहिती CITES (the Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora) या संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. १९७५ मध्ये CITES चा करार अस्तित्वात आला (ज्याला वॉशिंग्टन करार असेही म्हटले जाते) असून १८३ देशांनी त्या करारावर सह्या  केल्या आहेत. तो करार मान्य करणाऱ्या अगदी सुरवातीच्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. या करारात विविध स्तरावर संरक्षण दिलेल्या वन्यजीव व वनस्पतींची संख्या ३५,००० हुन अधिक आहे. 


भारतातील पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या बहुतेक संस्थांचा भर हा नैसर्गिक भूप्रदेश व सागरी प्रदेश व त्यावरील परिसंस्थांचे संरक्षण करणे हा आहे. त्याच्या जोडीला अशा परिसंस्थांतील जैवविविधतेचा विविध शास्त्रीय अंगांनी काटेकोरपणे अभ्यास करून त्याबाबतचा दस्तावेज निर्माण केला गेला तरच आपल्याकडची निसर्ग समृद्धी काय आहे व आपण काय गमावतोय याचे प्रत्यक्ष भान आपल्याला येईलअसे या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण बहुतेक वेळा वाघासारखे आकर्षणाचे केंद्रबिंदू वगळता इतर अल्प प्रमाणात ज्ञात असलेल्या व दुर्लक्षित पण महत्वाच्या प्रजातींच्या अवैध शिकारी व तस्करी बाबत ना फारशी दक्षता घेतली जात ना ते रोखण्याचे प्रयत्न होतांना दिसतात. पूर्वी राजे-महाराजे व खानदानी घराण्यांच्या शिकारींना शौर्याचे प्रतीक मानले गेल्यामुळे व आता वाघनखं, दात, विविध प्राण्यांची शिंगं, हस्तिदंत, कातडी, तसेच आरोग्यवर्धनाच्या गैरसमजुतीतुन प्राण्यांच्या विविध अवयवांच्या मागणीमुळे आणि त्याला मिळणाऱ्या मोठ्या आर्थिक फायद्यामुळे जीव धोक्यात घालून आजही वाघ, हत्ती, गेंडे, यांची शिकार होत आहे. स्थानिकांपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत लागेबांधे असलेल्या संघटित टोळ्यांच्या साखळ्या या उद्योगात कार्यरत असतात. या मोठ्या प्राण्यांबरोबच कस्तुरीमृग - कळविटांसारख्या हरणांच्या विविध प्रजाती, अस्वल, खवले मांजर, घोरपडी व इतर सरपटणारे प्राणी, धनेश सारखे काही पक्षी, कासवं, पोवळी व प्रवाळ, समुद्री घोडे, विविध प्रकारचे किटक, तसेच असंख्य दुर्मिळ वनस्पती यांचीही मोठ्या प्रमाणावर शिकार वा तस्करी होते. अशा नष्ट होणाऱ्या प्रजातींमुळे जैवसाखळीवर कसा परिणाम होतो याचे एक छोटे उदाहरण लेखात दिले आहे. बेडकासारख्या उभयचर प्राण्याच्या पायांना विदेशात प्रचंड मागणी असते. त्यासाठी भारतातून पूर्वी मोठ्या प्रमाणावर बेडकांची तस्करी व्हायची. या प्रकारचा बेकायदेशीर व्यापार तेंव्हा गांभीर्याने घेतला जात नव्हता. पण भारतातील प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ सालीम अली यांचे बंधू हुमायून अब्दुलअली यांनी पावसाळ्यात कीटकांच्या संख्येवर नैसर्गिक नियंत्रण ठेवणाऱ्या बेडकांचे अनन्यसाधारण महत्व सप्रमाण दाखवून दिले व घटत्या बेडकांच्या संख्येचा व शेतीतील किडीच्या वाढत्या प्रादुर्भावाचा व वाढलेल्या पावसाळी रोगराईचा परस्परसंबंध उजेडात आणला.  त्यानंतर १९८१ मध्ये बेडकांच्या निर्यातीवर बंदी घातली गेली. चार दशकांपूर्वी बेडकांच्या अशा व्यापाराचा आर्थिक आवाका कित्येक करोड रुपये होता. 


वन्यजीवांच्या या वाढत्या तस्करीला आज दुर्दैवाने जोड मिळाली आहे ती तंत्रज्ञानाची व लोकांच्या वाढलेल्या आर्थिक क्रयशक्तीची. एकीकडे आंतरजालाच्या (internet) वाढत्या प्रसारामुळे या व्यापाराला ‘ऑनलाईन’ चा आयाम मिळाला आहे. याविषयीच्या माहितीचा प्रसार जसा या माध्यमामुळे होतो आहे तसाच एका ‘क्लिक’ सरशी घरबसल्या मिळणारी सेवा व्यपाऱ्यांना जगातल्या कानाकोपऱ्यातल्या ग्राहकाशी थेट जोडून देत आहे. या प्रकारच्या व्यापाराची व्यापकता व गांभीर्य लक्षात घेऊन याला आळा घालण्यासाठी  WWF च्या तज्ज्ञ समितीच्या देखरेखीखाली The Wildlife Trade Monitoring Network आणि International Fund for Animal Welfare या कार्यगटांची स्थापना केली गेली आहे. ऑनलाईन  माध्यमातून होणाऱ्या  तस्करीला आळा घालणे हा याचा प्रमुख उद्देश आहे. 


तस्करीविरुद्ध आपले संपूर्ण आयुष्य वेचलेल्या भारतातील काही सर्वोत्कृष्ट अशा तज्ज्ञांचे या विषयाचे विविध पदर उलगडून दाखवणारे माहितीपूर्ण  लेख  ‘Trafficking Wildlife’ च्या या विशेषांकामध्ये समाविष्ट केले गेले आहेत. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी वन्यजीवांच्या शरीरापासून बनविल्या गेलेल्या उत्पादनांना नाकारून व अशा व्यवहारापासून स्वतःला दूर ठेऊन या प्रकारच्या बेकायदेशीर कृतीला पायबंद घालण्यास मदत करावी व अशा प्रकारच्या गैरकृत्याची माहिती मिळाल्यास, Additional Director, Wildlife Crime Control Bureau, 2nd Floor, Trikoot-1, Bhikaji Cama Place, New Delhi 110 066. Ph. No.: 011 - 26182484, email: addldir-wccb@gov.in वर संपर्क साधावा वा अधिक माहितीसाठी Website: http://wccb.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन संपादकीयाच्या शेवटी केले आहे. 


  • अजित बर्जे 

Comments

Popular posts from this blog

पृथ्वीचे रक्षक

ऑल इज नॉट वेल...