अशाश्वत पाम तेल
निसर्ग व पर्यावरणविषयक अनेक भल्या - बुऱ्या गोष्टी आपल्या अवती - भवती घडत असतात. नैसर्गिक आपत्ती सोडल्यास बहुतांशवेळा मानवाचा पर्यावरणातील हस्तक्षेप त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरतो . आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी हे विषय निगडित असले तरी ते आपल्यापर्यंत पोहोचतातच असे नाही. या विषयांना वाहिलेली काही मोजकी इंग्रजी नियतकालिकं आपल्याकडे जरी प्रसिद्ध होत असली तरी त्यांची पोहोच या क्षेत्राशी निगडित एका मर्यादित वर्गापर्यंतच सीमित राहते.
गेल्या नऊ वर्षाहून अधिक काळापासून 'हिरवं वाचन' या सदरातून अशा इंग्रजी नियतकालिकांतील पर्यावरणविषयक लेखांचा सटीक परिचय करून दिला जातो. निसर्गस्नेही जीवनशैली आणि पर्यावरणस्नेही विकासनीती ह्यांचा पुरस्कार करणारं व त्या दृष्टीने विचार आणि कृती कार्यक्रम पुढे ठेवणाऱ्या 'गतिमान संतुलन' या मासिकात हे सदर नियमित प्रसिद्ध होते. गतिमान संतुलन मासिकाच्या संपादकांच्या पूर्व परवानगीने ते लेख ब्लॉगवर प्रसिद्ध होतात.
अशाश्वत पाम तेल
मानवाने स्वयंपाकामध्ये तेलचा वापर सुरु केला त्याला आता मोठा काळ लोटला. संशोधकांच्या मते साधारण ५००० ते ८००० वर्षांपूर्वी तेलाचा अन्नासाठी वापर सुरु झाला. काळाच्या ओघात विविध वनस्पती आणि प्राणिजन्य घटकांपासून तेल काढण्याची कला मानावाने आत्मसात केली. याच अनुभवाच्या बळावर, फळांपासून तेल निर्मिती करणे हे किफायतशीर आहे हे त्याच्या लक्षात आले. स्वाभाविकपणे यासाठी वापरले गेलेले सर्व घटक निसर्गातीलच असले तरी त्याचे प्रमाण आणि वापर मर्यादित होता. मात्र पुढे जसजसा त्याचा उपयोग आणि वापर वाढत गेला तसतसा व्यापारी तत्वावर मोठ्या प्रामाणावर उत्पादन करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायांचा शोध सुरु झाला. या कसोटीला उतरणारा जगभरातला आजचा प्रमुख स्रोत आहे पाम, अर्थात ताडाच्या विशिष्ट प्रजातीच्या फळापासून केली जाणारी तेलाची निर्मिती. गेल्या काही दशकांमध्ये, पाम तेलाच्या वापराने उच्चतम पातळी गाठली आहे, याचे कारण काही प्रमाणात या तेलाचे उत्पादनाला अनुकूल गुणधर्म हे तर आहेच पण त्याच बरोबर उत्पादकांसाठी सुलभ असलेल्या पिक पद्धतीमुळे (झाडाला साधारण चार वर्षांनी फळधारणा होते आणि पुढे २५ वर्ष ते उत्पादन देते तर सोयाबीनची लागवड दर वर्षी करावी लागते ) आणि प्रामुख्याने उत्पादकतेमुळे (ज्याला सोयाबीनसारख्या अन्य मोठ्या प्रमाणात उत्पादित तेलाच्या तुलनेत निम्मी जमीन लागते) हा स्रोत व्यावहारिक दृष्ट्या सर्वाधिक किफायतशीर आणि फायदेशीर ठरतो.
पाम तेल आता जगातील सर्वात लोकप्रिय वनस्पती तेल आहे, ज्याचे उत्पादन एकूण जागतिक तेल उत्पादनाच्या एक तृतीयांश आहे. आपल्या देशाबरोबरच अन्य काही देशांमध्ये हे सामान्यपणे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तेल आहे. तर औद्योगिक स्तरावर निर्मित असंख्य ऊत्पादनांचा तो आता अविभाज्य घटक झाल्यामुळे त्याला टाळणे जवळजवळ कठीण झाले आहे. यातील बरीचशी उत्पादनं आज सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे ज्यामध्ये, सर्व प्रकारचे फास्ट फूड, बेकरी उत्पादनं, सौंदर्यप्रसाधनांपासून ते अगदी “पर्यावरणास अनुकूल” समजल्या जाणाऱ्या बायोडिझेल पर्यंत या तेलाचा संचार सर्वव्यापी झाला आहे. असे हे पाम तेल जगभरात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे त्याला करणे दोन; एक ते पर्यावणाच्या स्वास्थ्यासाठी जितके हानिकारक आहे तितकेच ते मानवी आरोग्यासाठी. त्याबरोबरच भारतात आता हा मोठा ज्वलंत विषय होऊ पाहतोय तो वर उल्लेखलेल्या कारणांबरोबरच केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या त्याविषयीच्या धोरणामुळे. हे धोरण पर्यावरणीय दृष्ट्या कसे आत्मघातकी आहे याविषयी विविध माध्यमातून बरेच लिहिले-बोलले जात आहे. मात्र आज आपण भारतात होऊ शकणाऱ्या संभाव्य परिणामांविषयी प्रसिद्ध झालेल्या एखाद्या लेखाची ओळख करून घेण्याऐवजी साधारण तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या नॅशनल जिओग्राफिक (डिसेंबर २०१८) मधील “Palm oil is unavoidable. Can it be sustainable?” या लेखाची माहिती घेणार आहोत. याला कारण काय होऊ शकते यापेक्षा जगाने पाम तेलविषयी काय अनुभव घेतला आणि काय उपाय योजिले याची हा लेख वस्तुनिष्ठ मांडणी करतो.
हा लेख प्रसिद्ध झाला त्याच्या एक वर्ष आधी म्हणजेच २०१७ साली युरोपियन युनियन मधील देशांमध्ये पाम फळापासून निर्मिती होणाऱ्या बायोडिझेलचा स्वयंचलित वाहनांचे इंधन म्हणून केला जाणारा वापर ५१% इतका होता. त्यावर्षीच्या आकडेवारीनुसार एकूण जागतिक खपा पैकी भारताचा वाटा १७% होता, त्यानंतर इंडोनेशिया, युरोपियन युनियन आणि चीन यांचा क्रमांक होता. त्यामध्ये अमेरिका आठव्या क्रमांकावर होता. २०१८ मध्ये जागतिक खप ७२ दशलक्ष टन किंवा अंदाजे ९ किलो प्रति व्यक्ती पाम तेलापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा त्यामध्ये व्यक्त केली होती.
सतत वाढणाऱ्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी १९७३ पासून, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांनी सामायिकपणे बोर्नियोमधील सुमारे १६,००० चौरस मैल इतक्या आकाराची पर्जन्यवृक्षाची जंगलं नष्ट केली. आजपर्यंत बोर्नियोच्या बेटांवरील एकूण ४७% जंगलं पामतेलाच्या मागणीमुळे साफ केली गेली आहेत.
ही सर्व जंगलतोड वन्यजीवांसाठी विनाशकारी ठरली आहे. १९९९ ते २०१५ या काळात सुमारे १५०,००० बोर्नियन ऑरंगुटन्सचा नाश झाला आणि आज या प्रजातीने गंभीर धोक्याची पातळी गाठली असून लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ही केवळ एका प्रजातीची व्यथा, यामध्ये एकूण जैवविविधतेच्या ह्रासाची तर गणतीच नाही. या जंगलतोडीमुळे हवामान बदलाची गती देखील वाढली असून इंडोनेशियाच्या उष्मसंचयी वायू उत्सर्जनापैकी जवळजवळ निम्म्याला जंगलतोड आणि इतर भू-वापराचे बदल कारणीभूत आहेत. तसेच जमीन मोकळी करण्यासाठी जंगलांना ज्या आगी लावल्या जातात त्यामुळे तीव्र वायू प्रदूषण होते. इंडोनेशियाच्या जंगलात लावल्या गेलेल्या आगीच्या धुरामुळे एका सर्वेक्षणानुसार एकट्या २०१५ मध्ये किमान १२,००० लोकांचा फुफुसाच्या आजाराने अकाली मृत्यू झाल्याची नोंद केली गेली होती.
तिथे वृक्षारोपणाच्या मार्गात येणाऱ्या स्थानिक लोकांना अनेक मार्गांनी त्रास सहन करावा लागला आहे. पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या जमातींना जबरदस्तीने बेदखल केले जाणे तसेच बालमजुरी यासारख्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचे अनेक अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर, पाम तेल कंपन्यांनी कधीकधी संपूर्ण आदिवासी गावे बुलडोझरच्या साह्याने नष्ट केली आहेत, ज्यामुळे तेथील रहिवासी बेघर तर झालेच आणि आजही त्यांना कुठीलीही भरपाई दिली गेली नाही.
इंडोनेशिया आणि मलेशिया हे देश आता पाम तेलाच्या उत्पादनाचे केंद्रबिंदू आहेत, परंतु तेल पामचे वृक्ष, मूळ आशिया खंडातले नाहीत. पश्चिम आणि मध्य आफ्रिका हे याचे मूलस्थान आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना तिथल्या जंगलात खोलवर असलेल्या नदीच्या खोऱ्यात सुमारे ३००० वर्ष जुने पाम वृक्षाचे अवशेष सापडले आहेत. १९व्या शतकात, ब्रिटीश व्यापाऱ्यांनी आफ्रिकेतून पाम तेल आयात करायला सुरवात केली. त्याचा वापर ते साबण, मेणबत्त्या या वस्तूंचा एक घटक म्हणून ते मार्जरीन (वनस्पती लोणी) याच्या उत्पादनांसाठी करत होते. पुढे शास्त्रज्ञांनी त्या तेलापासून ग्लिसरीन कसे वेगळे करावे हे शोधून काढल्यानंतर, त्याची उपयोगिता आणखी वाढली, ज्यामध्ये औषधे, छायाचित्रणाच्या फिल्म, अत्तरे ते अगदी सुरुंग - विस्फोटकांचा उत्पादनासाठी त्याचा वापर सुरु झाला.
२० व्या शतकाच्या अखेरीस तेल पाम या वृक्षाची वाण इंडोनेशियाला पोहोचली आणि पुढे व्यावसायिक वृक्षारोपणाने तिथे पकड घेतली. १९३० च्या उत्तरार्धापर्यंत त्या देशात याच्या लागवडीने अडीच लक्ष एकर क्षेत्र व्यापले. तर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, कृषी क्षेत्रातील प्रगती तसेच रोग प्रतिरोधक वृक्षांची पैदास, यामुळे अधिक उत्पादन मिळू लागल्याने जगातील व्यावसायिक तिथे आकृष्ट होऊ लागले आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू लागले.
असे असले तरीही, १९७० च्या दशकापर्यंत, बोर्नियोचा तीन चतुर्थांश भाग पर्जन्य वनांनी व्यापलेला होता. पण पाम तेलाची जागतिक मागणी वाढत असताना, ते पुरवण्याच्या शर्यतीत असलेल्या कंपन्यांनी त्यातील काही जंगले जाळली आणि नष्ट केली. ‘ट्रान्स फॅट्स’ हा हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने कळीचा मुद्दा केला गेला आणि वाढत्या मागणीप्रमाणे पाम तेलाने अनेक उत्पादनांमध्ये ट्रान्स फॅट्सची जागा घेतली ज्यामुळे पामच्या लागवडीला अजून तेजी आली. तोपर्यंत बायो डिझेलचे खूळ देखील वाढीस लागले होते. २१साव्या शतकाच्या सुरवातीच्या दशकात, ही तेजी इतकी वाढीस लागली की बघता बघता बोर्नियो बेताटाची हजारो चौरस मैल जंगले तेलाच्या लागवडीने व्यापून गेली.
तोपर्यंत, जंगलतोडीवर आंतरराष्ट्रीय संवर्धन गटांकडून दबाव वाढत होता आणि डब्ल्यूडब्ल्यूएफने पाम तेलाचे सर्वात मोठे उत्पादक आणि खरेदीदारांना पाम तेलाचे उत्पादन अधिक जबाबदारीने कसे करता येईल यादृष्टीने मार्गदर्शक तत्वे घालून दिली. राउंडटेबल ऑन सस्टेनेबल पाम ऑइल (RSPO) द्वारे प्रमाणित केल्या गेलेल्या या तत्त्वांनुसार नैसर्गिक जंगले किंवा जैवविविधतेचे संवेदनशील अधिवास असलेली क्षेत्र आणि नाजूक परिसंस्था पामच्या लागवडीसाठी नष्ट करता येणार नाही असा दंडक घातला गेला. तसेच जमिनीची धूप होणार नाही आणि पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत संरक्षित राहतील याची कटाक्षाने दक्षता घेणे अनिवार्य केले गेले. तसेच स्थानिकांना रोजगार आणि किमान वेतन दिले गेले पाहिजे ही बंधनं घालून दिली गेली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिक समुदायाकडून पूर्व परवानगी आणि ना हरकत असल्याची संमती प्राप्त करणे अनिवार्य केले गेले.
आग्नेय आशिया आणि आफ्रिकेत पामची लागवड आणि जगभरातला त्याचा वापर आता अनिवार्य आहे. पाम तेल नकोच असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. पर्यायी तेलबियांची पिके आणखी जमीन गिळंकृत करतील. अन्न पदार्थांव्यतिरिक्त देखील पाम तेल इतक्या व्यापक गोष्टींसाठी वापरले जात आहे की त्याचे उत्पादन पूर्णतः बंद करणे अव्यवहार्य आहे. त्यामुळे जर पाम तेलाचा वापर आमूलाग्रपणे कमी करता येणे शक्य नसेल तर ‘दगडा पेक्षा वीट मऊ’ या उक्तीप्रमाणे त्याचे उत्पादन सीमित करणे आणि पर्यावरणीय हानी कशी कमी करता येईल यासाठी सतत प्रयत्नशील राहणे हाच एकमेव मार्ग आहे असे मत लेखक हिलरी रोझनर मांडतात. तसेच त्यादृष्टीने आफ्रिकेतील गॅबॉन या देशात काय प्रयत्न सुरु आहेत याची माहिती देतात.
आज ज्या प्रकारची अदूरदर्शी पर्यावरणीय उधळपट्टी आग्नेय आशिया, विशेषतः मलेशिया आणि इंडोनेशिया या देशात सुरु आहे नेमकी तीच टाळण्याचा आफ्रिकेतील गॅबॉन हा देश प्रयत्न करत आहे. लेखकाने त्या देशात प्रत्यक्ष भेट दिल्यावर त्याचा त्यांना प्रत्यय आला. तेथील सरकारने नैसर्गिक जंगलांना संपूर्णतः संरक्षण दिले असून उत्पादकांना ठराविक मोकळ्या जागा लागवडीसाठी देऊ केल्या आहेत आणि केवळ त्याच भागात पिकं घ्यायला परवानगी दिली जाते.
त्या देशातील संवर्धन जीवशास्त्रज्ञ ली व्हाईट सांगतात "आम्ही आमच्या देशामध्ये एक नवीन विकासाचा मार्ग प्रचलित करीत आहोत जिथे जंगल न तोडता पाम, इतर शेती आणि वन संरक्षणामध्ये संतुलन राखतो," सरकार त्यासाठी जंगलांच्या कोणत्या भागांचे उच्च संवर्धन मूल्य आहे याचे वैज्ञानिक मूल्यांकन करून निसर्गाची हानी होणार नाही अशाच जागांवर शेतीला परवानगी देते. सध्या आपल्या पश्चिम घाटातील नैसर्गिक आपत्तीचे दुष्टचक्र बघता आणि गाडगीळ समितीच्या अहवालाची ज्या पद्धतीने मागच्या आणि आताच्या सरकारने वासलात लावली आहे त्या पार्शवभूमीवर इथे हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे की तेथील सरकार आपल्या शात्रज्ञांचे आणि तज्ज्ञांचे केवळ समिती नेमून अहवाल घेण्यापुरते सोपस्कार करत नाही तर त्यांच्या शिफारशींचे पालन करते आणि त्यांच्या मतांचा आदर राखते.
आज RSPO हे संघटन जागतिक पुरवठ्याच्या अंदाजे एक पंचमांश पाम तेल प्रमाणित करते. त्याच्या कार्यकक्षेत अन्य पाम तेल उत्पादकही यावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाम तेलावर अवलंबून असणाऱ्या अनेक उत्पादकांनी त्यांची पुरवठा साखळी केवळ RSPO प्रमाणित पाम तेलावर बदलण्याचे वचन दिले आहे. हे एक मोठे पाऊल असले तरी ते पुरेसे नाही याची लेखक दखल घेतात.
जीवशास्त्रज्ञ ली व्हाईट सांगतात, सुमारे १५०० वर्षांपूर्वी, गॅबॉन आणि उत्तर कांगोचा मोठा भाग पाम च्या लागवडीने व्यापला होता. त्या काळी मध्य आफ्रिकाचा हा प्रदेश, कदाचित आजच्या इंडोनेशियासारखा दिसत असेल. त्यावेळीही लोकसंख्येवर एक मोठा आघात झाला होता आणि मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या - कदाचित एखाद्या साथीमुळे - नष्ट झाली होती आणि पर्जन्यवने पुन्हा बहरली होती.” ते पुढे म्हणतात की “आमच्या यापुढच्या कृतीच ठरवतील की आपण पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करणार आहोत की त्यापासून काही शिकणार आहोत. दुर्दैवाने मानवासाठी, संतुलन हे अनेकदा मायावी मृगजळासारखे असते.” इतिहासाकडून काहीही धडा न घेता दुर्दैवाने आजही आपण पुन्हा त्याच वळणावर आहोत.
जिज्ञासूंसाठी आंतरजालावर उपलब्ध असलेले याविषयीचे काही स्रोत खालीलप्रमाणे :
यू ट्यूब वरचे माहितीपट :
▶ ‘The Devastating Effects of the World’s Palm Oil Addiction’
▶ ‘How Dirty is India’s Palm Oil?’
▶ ‘Palm Oil: Is Rs 11,040 Crore Being Spent to Destroy India’s Health, Agriculture and
Biodiversity?’
डाऊन टू अर्थ पोर्टल वरील काही ब्लॉग आणि बातम्या:
▶ Palm Oil and Environmental, Social Challenges in India: The Road Ahead
By Ramesh Abhishek , Neha Simlai , Sneha Maheshwari, Published: Monday 16 Aug 2021
▶ Oil Palm in India’s Northeast: Economy Vs Ecology
By Aakriti Shrivastava, Published: Friday 04 November 2016
▶ World Environment Day: How our greed for palm oil is destroying tropical rainforests
By Abhijit Mohanty, Published: Friday 04 June 2021
अजित बर्जे
Comments
Post a Comment