प्लॅनेट ऑफ ह्यूमन्स

 

निसर्ग व पर्यावरणविषयक अनेक भल्या - बुऱ्या गोष्टी आपल्या अवती - भवती घडत असतात. नैसर्गिक आपत्ती सोडल्यास बहुतांशवेळा मानवाचा पर्यावरणातील हस्तक्षेप त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरतो . आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी हे विषय निगडित असले तरी ते आपल्यापर्यंत पोहोचतातच असे नाही. या विषयांना वाहिलेली काही मोजकी इंग्रजी नियतकालिकं आपल्याकडे जरी प्रसिद्ध होत असली तरी त्यांची पोहोच या क्षेत्राशी निगडित एका मर्यादित वर्गापर्यंतच सीमित राहते.
 गेल्या पाच वर्षाहून अधिक काळापासून 'हिरवं वाचनया सदरातून अशा इंग्रजी  नियतकालिकांतील पर्यावरणविषयक लेखांचा सटीक परिचय करून दिला जातो. निसर्गस्नेही जीवनशैली आणि पर्यावरणस्नेही विकासनीती ह्यांचा पुरस्कार करणारं व त्या दृष्टीने विचार आणि कृती कार्यक्रम पुढे ठेवणाऱ्या 'गतिमान संतुलन' या मासिकात हे सदर नियमित प्रसिद्ध होते.  गतिमान संतुलन मासिकाच्या संपादकांच्या पूर्व परवानगीने ते लेख ब्लॉगवर प्रसिद्ध होतात. 



प्लॅनेट ऑफ ह्यूमन्स 


“आज पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली जगभरात जे काही चालू आहे ते म्हणजे टायटॅनिकला हिरवा रंग देण्यासारखे आहे; काहीही केलं तरी ती बुडणारच आहे…” मिट्ट काळोखात, आकाशात एखादी वीज चमकून सभोवताली लख्ख प्रकाश पडावा असेच हे वाक्य, डोळसपणे सभोवताली बघितलं तर त्याच्या गर्भित अर्थाची सत्यता पटवणारं. सोलापूर जिल्ह्यातल्या अंकोली येथील विज्ञानग्रामच्या अरुण देशपांडे यांच्याशी मागील वर्षी पहिल्या टाळेबंदीच्या काळात बोलतांना औद्योगिकरणानंतरच्या मानसिकतेतून विकसित झालेल्या पर्यावरण संवर्धनाच्या उपाययोजनांविषयी त्यांनी उच्चारलेले. कोरोनामुळे टाळेबंदी घोषित झाल्यावर आपल्या मूळ गावी परतणाऱ्या स्थलांतरितांवर जी परिस्थिती ओढवली त्याचे मूळ आपल्या विकासाच्या संकल्पनेत असून त्याला सशक्त पर्याय ते रुजवू पाहत असलेल्या ‘रुर्बन’ संकल्पनेत आहे असा त्यांचा ठाम विश्वास. त्याविषयी त्यांच्याकडून जाणून घ्यावे यासाठी आमचा संवाद झाला होता. इलेक्ट्रिक वाहनं, जैव इंधन, एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी, पावसाच्या सुरवातीला लाखो-कोटी आकडेवारीनिशी जाहीर होणारी वृक्षारोपणं, ग्रीन आर्किटेक्चर, विविध इको फ्रेंडली उत्पादनं इ. इ. … ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी योजले जात असलेले हे आणि असे अगणित उपाय म्हणजे चिघळणाऱ्या जखमेवर हरित मुलामा देणारी केवळ मलमपट्टी ठरते. वरील वाक्य पुन्हा आठवायचे कारण म्हणजे हरित ऊर्जेविषयीच्या प्रचलित समजुतीची चिरफाड करणारा याच दरम्यान प्रदर्शित झालेला जेफ गिब्स दिग्दर्शित माहितीपट ‘प्लॅनेट ऑफ दी ह्युमन्स’. एक तास चाळीस मिनिटांचा हा माहितीपट जसे अरुण देशपांडे यांच्या वक्तव्याचा प्रत्यय देणारा तसेच एंट्रॉपी या शब्दाचा ऑक्सफर्ड शब्दकोशातील तंत्रज्ञान, भौतिकशास्त्र आणि व्यापारउदीम या अनुषंगाने दिलेल्या प्रत्येक अर्थाचे प्रकटीकरण करणारा. 


‘प्लॅनेट ऑफ दी ह्युमन्स’ या माहितीपटाचा मूळ गाभा हा आज बोलबाला झालेल्या सौर तसेच पवन यासारख्या नवीनक्षम समजल्या जाणाऱ्या ऊर्जा या अंतिमतः जीवाश्म इंधनांवरच कशा अवलंबून आहे हे उघड करण्यावर आहे. जुलै २०१९ मध्ये अमेरिकेतील ‘ट्रॅव्हर्स सिटी फिल्म फेस्टिव्हल’ (TCFF) येथे प्रथमतः प्रदर्शित झालेला हा माहितीपट २१ एप्रिल २०२० रोजी वसुंधरा दिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला जगभरातल्या लोकांना निःशुल्क पाहता यावा यासाठी ‘युट्यूब’ वर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट महोत्सवाच्या प्रदर्शनाच्या वेळी दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक जेफ गिब्स म्हणाले होते की, “पर्यावरण रक्षणाच्या आज प्रचलित असलेल्या विचारधारेला, विशेषत: जे सौर आणि पवन ऊर्जेला "पवित्र गाई" सारखे मानतात त्यांच्यासाठी, हा छेद देणारा माहितीपट आहे.”

उष्मागतिकीचा सिद्धांत सांगतो की ऊर्जा निर्माणही करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. कुठलाही ऊर्जेचा  स्रोत जाळल्याने त्यातून मिळणारी कार्यक्षम ऊर्जा ही नेहमीच कमी असते. उष्मागतिकीच्या दुसऱ्या सिद्धांतानुसार याला एन्ट्रॉपीमध्ये वाढ होणे असे म्हटले जाते. 

आज आपले प्रगतीचे मापदंड ऊर्जाधारित विकास संकल्पनेवरच अवलंबून आहेत आणि हरित ऊर्जा हे आज चलनी नाणे आहे. याचे दृश्यरूप असलेल्या सौर आणि पवनऊर्जा या हरितविकासाचे द्योतक झाल्या आहेत. असे असले तरी त्याच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आपल्याला आज आणि यापुढेही जीवाश्म उर्जेचाच वापर करावा लागणार आहे. प्रत्येक वेळी आपण जेव्हा अशी ऊर्जा वापरतो, तेव्हा आपण एन्ट्रॉपी वाढवतो म्हणजेच, निर्माण झालेल्या ऊर्जेच्या आधारे कार्य करण्यासाठी उपयुक्त ऊर्जेची क्षमता कमी करतो. त्यासाठी भूगर्भात गाडलेल्या कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू या जीवाश्म इंधनांचा वापर करत असल्याने त्याद्वारे पृथ्वीवरील उष्मासंचयी वायूचे प्रमाण कमी न करता वाढवतंच आहोत हा या माहितीपटाचा सांगावा आहे. 

‘संकटात सापडलेल्या एका ग्रहाला वाचवण्याच्या’ लढाईत अब्जाधीश, बलाढ्य उद्योग आणि श्रीमंत कौटुंबिक सामाजिक संस्थांनी मुख्य प्रवाहातील पर्यावरण गट आणि नेत्यांबरोबर जे संधान बांधले आहे त्यामागची भूमिका तपासणे हा या माहितीपटाचा उद्देश आहे. याबरोबरच, पृथ्वीवरील एकूण मर्यादित संसाधनांच्या आधारे लोकसंख्येच्या मोठ्या वर्गाचा उपभोग आणि वाढत्या आकांशा केवळ हरित ऊर्जा निर्मितीतून भागवली जाऊ शकते का असा प्रश्न याद्वारे उपस्थित केला गेला आहे. आज पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा या हरित असल्याचे जे चित्र रंगविले जात आहे आणि त्यांना जे प्रोत्साहन दिले जात आहे ते खरोखरच तसे आहे का असा प्रश्न या माहितीपटाच्या माध्यमातून उपस्थित केला गेला आहे.  

सदर माहितीपट युट्यूब वर पाहण्यासाठी सर्वांना उपलब्ध असल्याने (आंतरजालावरील त्याचा दुवा शेवटी दिला आहे) त्यामध्ये काय दाखवले आहे याविषयी इथे चर्चा न करता हा माहितीपट जे प्रश्न उपस्थित करतो त्याविषयी आणि तो बनवण्यामागची माहितीपटाच्या निर्माते-दिग्दर्शक यांची भूमिका काय आहे हे समजून घेणे हे अधिक समयोचित ठरते. याचे कारण या माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर अमेरिकेत तीव्र वाद निर्माण झाला होता. काही हवामान शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञानाच्या समर्थकांनी हा माहितीपट दिशाभूल करणारा आणि कालबाह्य तथ्यांवर आधारित असल्याची टीका केली होती. त्यानंतर एका साध्याशा स्वामित्व हक्क (copyright) कायद्याच्या उल्लंघनाच्या दाव्यामुळे हा माहितीपट मे २०२० मध्ये यूट्यूबवरून उतरवला गेला. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या दाव्याला आव्हान दिले आणि असा युक्तिवाद केला की हा भाग ‘योग्य वापराखाली उपलब्ध’ या तत्वानुसार (fair use) वापरला गेला आहे. त्यानंतर, केवळ बारा दिवसांनंतर, यूट्यूबने त्यांच्या माध्यमावर हा माहितीपट पुनर्स्थापित केला. दरम्यानच्या काळात या माहितीपटाच्या निर्मात्यांनी इतर समाजमाध्यमांवर दर्शकांसाठी तो उपलब्ध करून दिला.  

माहितीपटाचे दिग्दर्शक जेफ गिब्स स्वतः सौर आणि पवन यासारख्या हरित म्हणून समजल्या जाणाऱ्या ऊर्जेचे दीर्घकाळ समर्थक होते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी जेव्हा अब्जावधी डॉलर्स अक्षय ऊर्जेमध्ये गुंतवणूक करण्याचे संकेत दिले, तेव्हा गिब्स यांनी हरित ऊर्जा चळवळी विषयी अधिक बारकाईने निरीक्षण करण्यास सुरवात केली, परंतु प्रथमदर्शनी पुढे आलेल्या निष्कर्षांमुळे ते निराश झाले. गिब्स म्हणतात, " जी जी हरित ऊर्जेविषयी तथ्य समोर आली, जे जे दावे केलेले आढळले, ते ते प्रत्यक्षात तसे नव्हते." त्यामुळे अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या प्रसिद्ध वाचनाप्रमाणेच गिब्स प्रश्न करतात की, "औद्योगिक सभ्यतेने निर्माण केलेले प्रश्न त्याच सभ्यतेने बनवलेल्या यंत्रांद्वारे आम्हाला वाचवू शकतील का?"


पारंपरिक वीज वाहक जाळ्याशी (grid) जोडलेले असूनही ऍपल, टेस्ला यासारख्या काही कंपन्या १००% नवीनक्षम ऊर्जेवर चालण्याचा दावा करतात यावर माहितीपटाचे सहनिर्माते ओझी जेहनेर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. तर गिब्स याकडे लक्ष वेधतात की आत्यंतिक ऊर्जा सघन प्रक्रियेचा आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करून तयार केलेल्या सौर आणि पवन ऊर्जेच्या संरचना केवळ काही दशके टिकतात. आज हे तंत्रज्ञान तुलनेने नवीन असल्याने त्याचे अप्रूप आहे. त्याचा विहित कालावधी संपल्यानंतर त्या पूर्णतः मोडीत तर काढाव्या लागतीलच पण त्यातून भविष्यात जो प्रचंड विषारी कचरा निर्माण होणार आहे त्याचे गांभीर्य आज कुठल्याही स्तरावर दिसून येत नाही. ते सांगतात की जेव्हा पवन झोतयंत्र (turbine) त्यांचा विहित कालावधी पूर्ण करतात, तेव्हा त्यांच्या फुटबॉलच्या मैदानाइतक्या लांब असलेल्या फायबरग्लासच्या एक-एक पात्यांचे पुनर्घटन व पुनर्वापर  करणे अशक्य आहे. परिणामी, सुरवातीच्या काळातील व आता आयुष्य पूर्ण झालेल्या अशा झोतयंत्रांचा अमेरिकेतील ग्रामीण भागातल्या कचरागारात (dumping site) ढिगाने कचरा जमा होत आहे. दरम्यान, ‘ग्रिस्ट’ या पर्यावरण विषयाला वाहिलेल्या नियतकालिकाने ऑगस्ट अंकात प्रसिद्ध केलेल्या एका लेखामध्ये कार्यक्षमता संपलेल्या सौर तावदानांचा (solar panels) भविष्यात कित्येक सहस्रावधी वजनाच्या विषारी कचऱ्याचा जो “महापूर” निर्माण होणार आहे त्याबद्दल गंभीर चर्चा केली आहे.


माहितीपटाचे दिग्दर्शक जेफ गिब्स म्हणतात, "आपण जेव्हा हवामान बदलावर उपभोगवादी दृष्टिकोनातून उपायांची मागणी करतो, तेव्हा आपल्यावर भांडवलशाही शक्ती स्वार होतात जे आपल्याला सौर आणि पवन ऊर्जेसारखे विनाशकारी उपाय योजून त्याचे ग्राहक बनवू इच्छितात. यावर कळस म्हणजे, आपण जे काही करत आहोत ते ग्रहाला 'वाचवण्यासाठी' असा अविर्भाव त्यामागे असतो." तर ओझी जेहनेर म्हणतात की “या माहितीपटाद्वारे आम्ही उपभोग-आधारित आर्थिक संरचनेचे धोके काय आहेत यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.’ प्रश्नाच्या नेमक्या मर्मावर बोट ठेवतांना ते म्हणतात की “आमच्याकडे उर्जा संकट नाही, तर उपभोग संकट आहे!"


पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ विल्यम रीस म्हणतात की पवन आणि सौर ऊर्जा निर्मितीमध्ये कितीही वेगाने वाढ केली, कितीही सवलती दिल्या, तरीही आपला मूळ प्रश्न सुटणार नाही. याचे कारण प्रत्यक्षात ऊर्जेचा वापर आणि त्याची वाढती मागणी कमी करण्याऐवजी आपण एकूण मागणीचा पाठलाग करत आहोत. रीस आकडेवारीनिशी दाखवून देतात की विजेची जागतिक मागणी ही कमी न होता सातत्याने वाढत आहे आणि आपण वाढत्या उपभोगाचा पाठलाग करणार असू तर एकूण उत्पादनापेक्षा ऊर्जेची मागणी केव्हांही अधिकच असणार आहे.


आजकाल जगभरात धनवंत, प्रसिद्ध उद्योजक घराणी, प्रसिद्धीच्या वलयात वावरणाऱ्या व्यक्ती यांच्यामध्ये आपण कसे कडवे पर्यावरणवादी आहोत हे दाखवण्याची अहमिका लागली आहे. तर सरकारी योजनांचा गैरवाजवी फायदा घेत बक्कळ सोयी-सवलती, अनुदानं, जमिनी आणि संसाधनं यावर ताबा मिळवून देणारे नवीन साधन हरित ऊर्जेच्या रूपाने उद्योगपतींना आता गवसले आहे.


या क्षेत्राशी निगडित उद्योग, हितसंबंधी, माहितीपटात थेट उल्लेख केलेल्या दिग्गजांनी, तसेच काही हवामान शास्त्रज्ञांनी हा माहितीपट कालबाह्य आणि दिशाभूल करणारा असल्याचे जे आरोप केले होते त्याला उत्तर देताना, एका मुलाखतीत गिब्स म्हणाले होते की "आमचा उद्देश पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणारे शिलेदार तसेच या क्षेत्रातल्या संस्था आणि त्याच्या नेतृत्वावर टीका करण्याचा अजिबात नाही. आम्हाला आमच्या या पर्यावरण रक्षकांची नितांत गरज आहे. आम्हाला फक्त सौर आणि पवन ऊर्जेचा क्षेत्रात काय चालले आहे याबद्दल लोकांना जागृत करायचे होते". चित्रपट बनवण्याच्या त्यांच्या मूळ उद्देशाचा सारांश सांगतांना गिब्स म्हणतात की, "मानवाच्या एकूणच व्यवहाराबद्दल, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून जे हरित तंत्रज्ञान विकसित होत आहे त्यातून खरोखरच हवामान बदलाचे निराकरण होणार आहे का याबद्दल सर्वसमावेशक चर्चा सुरू करणे हा या माहितीपटाचा हेतू आहे."  पुढे ते म्हणतात की, केवळ “हवामान बदल” एवढ्याच संकुचित दृष्टीच्या पलीकडे जाऊन पर्यावरणावर होणाऱ्या एकूण मानवी प्रभावाकडे पहिले जावे आणि त्यादृष्टीने चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी हा माहितीपट निर्माण करण्यात आला आहे. लोकसंख्येचा विस्फोट आणि समकालीन काळात पृथ्वीतलावरून विलुप्त आणि नामशेष होत जाणारे सजीव आणि वनस्पती याचा जो अनोन्य आंतरसंबंध आहे त्याचाही गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे आणि हरित तंत्रज्ञान या समस्यांचे निराकरण करू शकते का हा महत्वाचा प्रश्न आहे.


“स्वच्छ” ऊर्जा योजनेच्या नावाखाली जगभर आज ज्या कर सवलती आणि अनुदानांना पूर आला आहे याबद्दल जनता जरी खुश असली तरी एकुणात हे नवीन तंत्रज्ञान ज्या सबबीखाली विकसित होत आहे त्याच्या व्यवहारिकतेबद्दल आणि उद्दिष्टपूर्ततेबद्दल तीच जनता पूर्णपणे अंधारात आहे. आणि समजा हे महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ उर्जेचे’ उद्दिष्ट पर्यावरणासंबंधी कोणताही भरीव बदल करण्यास अपयशी ठरले, तरी हरित तंत्रज्ञानामधील गुंतवणूकदारांच्या वाढत्या वर्गाला त्यातून भरगोस आर्थिक परतावा देण्याचे आणखी एक नवीन दालन, तात्पुरते का होईना, खुले झाले आहे.


ग्रहावरल्या मर्यादित संसाधनाच्या बळावर अमर्याद वाढीची मानवाची असीम इच्छा ही आत्मविनाशी आहे. अब्जाधीश आणि भांडवलदारांच्या हाती जाणारी पर्यावरण चळवळ लवकरात लवकर सामान्यांनी स्वतःच्या हाती घ्यावी असे आवाहन माहितीपटाच्या शेवटी गिब्स करतात. महाकाय यंत्रांद्वारे ओरबाडल्या जाणाऱ्या व बेचिराख होणाऱ्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर एका निष्पर्ण वृक्षावर असहायपणे एक आई ओरँगउटन आणि तिच्या लेकराची  जगण्यासाठी होणारी धडपड या हृदयद्रावक दृष्याद्वारे माहितीपटाचा शेवट होतो.


जाता जाता - रिलायन्स कंपनी पुढील तीन वर्षात अक्षय ऊर्जा क्षेत्रात ७५,००० कोटी रुपये खर्च करून जामनगर येथे ५००० एकर जागेत चार महाकाय कारखाने (Giga factories) उभारणार आहे अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कंपनीच्या या वर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेत केल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकली होती. ‘प्लॅनेट ऑफ दि ह्यूमन्स’ हा माहितीपट बघितल्यावर त्याद्वारे आकळणारे सत्य आणि मुकेश अंबानी यांची घोषणा यामध्ये साधर्म्य आढळ्यास तो निव्वळ योगायोग समजावा…   

(माहितीपटाचे सहनिर्माते, ओझी जेहनेर यांचे नेब्रास्का विद्यापीठाने २०१२ साली प्रकाशित केलेले ‘Green Illusions: The Dirty Secrets of Clean Energy and the Future of Environmentalism’ हे पुस्तक जिज्ञासूंनी अवश्य वाचावे.) 


‘Planet of the Humans’ माहितीपटाचा ‘युट्यूब’ वरील दुवा : https://youtu.be/Zk11vI-7czE



-   अजित बर्जे 

   

Comments

Popular posts from this blog

ऑल इज नॉट वेल...

धोक्यातील बेटं

माणसाने माणसाशी माणसा सम वागणे!