विष्ठेचे विश्वरूपदर्शन 

                             

निसर्ग व पर्यावरणविषयक अनेक भल्या - बुऱ्या गोष्टी आपल्या अवती - भवती घडत असतात. नैसर्गिक आपत्ती सोडल्यास बहुतांशवेळा मानवाचा पर्यावरणातील हस्तक्षेप त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरतो . आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी हे विषय निगडित असले तरी ते आपल्यापर्यंत पोहोचतातच असे नाही. या विषयांना वाहिलेली काही मोजकी इंग्रजी नियतकालिकं आपल्याकडे जरी प्रसिद्ध होत असली तरी त्यांची पोहोच या क्षेत्राशी निगडित एका मर्यादित वर्गापर्यंतच सीमित राहते.
 गेल्या पाच वर्षाहून अधिक काळापासून 'हिरवं वाचन' या सदरातून अशा इंग्रजी  नियतकालिकांतील पर्यावरणविषयक लेखांचा सटीक परिचय करून दिला जातो. निसर्गस्नेही जीवनशैली आणि पर्यावरणस्नेही विकासनीती ह्यांचा पुरस्कार करणारं व त्या दृष्टीने विचार आणि कृती कार्यक्रम पुढे ठेवणाऱ्या 'गतिमान संतुलन' या मासिकात हे सदर नियमित प्रसिद्ध होते.  गतिमान संतुलन मासिकाच्या संपादकांच्या पूर्व परवानगीने ते लेख ब्लॉगवर प्रसिद्ध होतात. 



विष्ठेचे विश्वरूपदर्शन !
नैसर्गिकरीत्या निर्माण होणारा कुठलाही घटक हा ना कचरा असतो, ना निरुपयोगी : मग ती अगदी कुठल्याही सजीवाची विष्ठा का असेना. मलमूत्र-विसर्जनाची क्रिया हा कुठल्याही सजीवाच्या जीवनाचा नि:संशय अविभाज्य भाग : किंबहुना तो सजीव जीवित असल्याचे ते प्रमुख लक्षण. मानवी सभ्यता जसजशी विकसित होत गेली, तसतसा हा विषय केवळ किळसवाणा म्हणूनच नव्हे, तर घृणास्पद म्हणून दुर्लक्षिला गेला. गटारांमधून नदी, नाले, ओढे वा ओसाड जागीं नेऊन टाकण्याची ती घाण. प्रदूषण व रोगराईचे ते एक महत्त्वाचे कारण. फार तर फाळीव जनावरांचे शेण, वा क्वचित सोनखत म्हणून मानवी विष्ठा काही जणांच्या माहितीची.
ह्या अशा दुर्लक्षित विषयाचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतलेला अवलिया म्हणजे रिचर्ड जोन्स. सजीवांच्या मल-मूत्राचं विश्वरूपदर्शन त्यानं एका दस्तऐवजातून घडवलं आहे : Call of the Nature : The Secret World of Dung. जवळफास चारशे पानांच्या ह्या जाडजूड ग्रंथात प्रत्येक सजीवाच्या दिनचर्येतील ह्या दुर्लक्षित घटकाचे कल्पनेपलीकडील जग तो उलगडून दाखवतो. जोन्सच्या ह्या अभ्यासाविषयी त्याच्याशी झालेला संवाद Down to Earth च्या डिसेंबर २०१८ च्या दुसऱ्या अंकात (दि. १६-३१) प्रसिद्ध झाला आहे. ह्या पुस्तकात मानव, प्राणी, पक्षी, कीटक अशा अनेक सजीवांच्या नैसर्गिक विधीच्या घटकाचे जगात होणारे आश्चर्यकारक उपयोग तर सांगितलेले आहेतच; पण, आजच्या सभ्यतेमधे जी गोष्ट सर्वांसमक्ष उघडपणे बोलली जात नाही, ती जैविक दृष्टिकोणातून खरे तर एक अद्भुत क्रिया असून निरर्थक वा किळसवाणे असे त्यात काहाही नाही असे तो ठासून सांगतो.
सजीवाच्या शरीरातून बाहेर पडल्यापासून विष्ठेवरील प्रक्रियेची एक सूत्रबद्ध शृंखला असते. कालमर्यादेच्या एका विशिष्ट चौकटीत त्या मैल्याचा जास्तीत जास्त प्रभावी वापर करण्यासाठी शेण भक्षण करणारे किडे, कृमी, निसर्गातील स्वच्छताकर्मी, भक्षक जीव, परजीवी अशी सर्वांची मिळून एक साखळी कामाला लागते. ह्या संबंधीची माहिती देण्याबरोबरच जोन्स विविध देशांत मानवाने त्याच्या कल्पनाविलासातून अनेक कल्पक, विचित्र, गूढ; तर कधी कधी खोट्या व मूर्खपणाच्या रूढी कशा निर्माण केल्या आणि त्याबरोबरच निरीक्षणशक्तीचा वापर करून स्वत:च्या फायद्यासाठी ह्या सर्व क्रियाप्रक्रियेचा कसा वापर केला ते उलगडून दाखवतो.
ह्या विषयावर संशोधन करताना कुठल्या गोष्टीने आकर्षित केलेह्याचे उत्तर देताना जोन्स म्हणतो की, जनावराची केवळ एक लीद एवढाच विचार केला, तरी ती स्वयं एक नैसर्गिक परिसंस्था आहे. शाकाहारी सस्तन प्राण्यांच्या अन्नपचन-प्रक्रियेचे विश्लेषण केले तर असे दिसते की, पचनातून  शरीरासाठी उपयुक्त असे केवळ १० ते २० % अन्नघटकच वापरले जातात. उर्वरित न वापरलेले घटक मलाद्वारे बाहेर पडतात. निसर्गाची योजना अशी की, न वापरलेले ते घटक ज्या स्वरूपात बाहेर टाकले जातात, ते वर उल्लेखिलेल्या असंख्य जीवांसाठी तयार अन्न (रेडी टु ईट) असते. काही कीटकांच्या जीवनशृंखलेचे ते आगर असते; कारण, तिथेच त्यांची अंडी घातली जातात व त्यातूनच त्यांचे जीवनचक्र सुरू राहते. हे सर्व केवळ सुरुवातीचे काही तासच. त्यानंतर जसजशी त्यातील आर्द्रता कमी होत जाते, तसतसे कुजण्याच्या प्रक्रियेत तिथे दुसऱ्या फळीचे सफाईदूत कामाला लागतात. ते जिवाणूंच्या स्वरूपाचे असतात. काही काळाने त्यांचे कार्य संपते व शेवटी जे उरते ते केवळ मातीसमान, कुठलाही दुर्गंध नसलेले बहुमोल खत. अतिशय क्षुद्र वाटणार्या गोठीची ही शृंखला केवळ अचंबित करणारी अशीच.
अतिशय आकर्षक, गुबगुबीत व काही चटकदार रंगांमधे आढळणाऱ्या शेणकिड्यांविषयी (dung bettles) जोन्सना विशेष रुची आहे. प्राचीन काळी इजिप्तमध्ये ह्या किड्यांना पुजले जायचे. शेणावर जगणारे अन्य अनेक किडे असले, तरी ह्या किड्यांची शेण गोळा करून वाहून नेण्याची वैशिष्ट्यपूर्ण लकब अतिशय चित्ताकर्षक अशी असते. हत्तीच्या विष्ठेबाबत जंगलांमध्ये ह्या किड्यांवर केल्या गेलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, त्यांना ताज्या शेणाचा क्षणार्धात सुगावा लागतो; अल्पाEdward Island'ceOÙesEdward Island'ceOÙesवधीत तिथे हजारोंच्या संख्येने ते जमा होतात व केवळ काही तासांत हत्तींची कित्येक किलो लीद ते लोटत लोटत नेऊन, चेंडूसारखे शेणगोळे बनवत, त्यांच्या साठवणुकीच्या जागी घेऊन जातात. जगभर एकीकडे मलनि:सारणासाठी अवाढव्य खर्च करून जटिल उपाययोजनांद्वारे हा विषय हाताळला जात असताना, अनादि काळापासून ज्या निर्दोष पद्धतीने निसर्गात ही जैविक यंत्रणा अव्याहतपणे सुरू आहे, त्यापासून बुद्धिमान म्हणवणाऱ्या मानवाने काही एक न शिकता, केवळ फ्लशकरून आपली सुटका करून घेतली. एकूणच निसर्गापासून तुटत चाललेल्या शहरवासीयांना पुढे भूमिगत गटारांमधून मलाचे काय होते ह्याबाबत एक तर अनभिज्ञता असते, अथवा उदासीनता. त्यामुळे शेणावर होणारी ही नैसर्गिक प्रक्रिया हा बहुतेकांसाठी साक्षात्कारच असतो!
केवळ काही दशकांपूर्वी परिस्थिती ह्याच्या अगदी विरुद्ध होती. चीन, जपानपासून   बऱ्याच पौर्वात्य देशांत मानवी विष्ठेला सोन्याचे मोल होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तर ब्रिटनात मैला शेतांपर्यंत वाहून नेऊन जमीन सुपीक केली जायची. पुढे रासायनिक खतांचे उद्योग वाढीस लागल्यावर कळत नकळतप्रगत शेतीच्या भ्रामक कल्पनेने पूर्वापार चालत आलेली ही प्रथा लोप पावली. आज सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकता वाढीस लागली असली, तरी सोनखताचे मोल अजूनही दुर्लक्षितच आहे. खत; व काही प्रमाणात इंधन म्हणून होणारा शेणाचा वापर सोडल्यास जगभर अतिशय विलक्षण पद्धतीने त्याचा कसा वापर होत गेला ह्याबाबत सांगताना १६९३ साली प्रसिद्ध झालेल्या ‘The Complete English Physician' ह्या पुस्तकाचा दाखला जोन्स देतात. त्यामध्ये कावीळ, डांग्या खोकला व देवी ह्यांसारख्या रोगांवर इलाज म्हणून शेळीच्या लेंड्यांपासून बनवलेल्या चहाच्या काढ्याची उपाययोजना नमूद केलेली आहे. मधल्या काही कालखंडात ह्या औषध-कोशातील उपचारपद्धतींची जरी खिल्ली उडवली गेली, तरी अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेल्या ‘Dictionary of Prince Edward Island' मध्ये काही जमाती आजही ह्या प्रकारचा उपचार करत असल्याची व तो खात्रीशीर असल्याची पुष्टी केली गेली आहे. ह्याच धर्तीवर जगातील विविध भागात प्राणी, पक्षी ह्यांच्या विष्ठेचा उपयोग कसा होतो ह्याबाबत ते सांगतात की, पानमध्ये नाईटिंगेल पक्ष्याची विष्ठा ही चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरतात. काही ठिकाणी कोंबडीची विष्ठा हा टक्कल पडण्याच्या समस्येवरचा उपाय आहे; तर, सुदान देशात काही जमाती गोमूत्राचा वापर केसांना कलप करण्यासाठी करतात. ह्या व्यतिरिक्त आफ्रिकेतील काही जमाती सिंहाच्या विष्ठेचा उपयोग तृणभक्षक प्राण्यांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी करतात. एका परंपरेनुसार तुर्की देशात प्रवासी मेंढपाळ हे मेंढ्यांच्या विष्ठेची विशिष्ट चौकटीत मांडणी करून गूढविद्येद्वारे भविष्यकथन करत. काही ठिकाणी हत्तीच्या लिदेचा वापर कागद बनवण्यासाठी केला गेला असून, आता घोडा, गाढव, फांडा ह्यांसारख्या मोठ्या तृणभक्षी प्राण्यांच्या लिदेपासूनही कागद बनवण्याचे प्रयोग सुरू आहेत. अशा विष्ठेमध्ये मोठ्या प्रमाणावर तंतुमय पदार्थच असल्याने, व काही कालावधीनंतर त्यातील दर्पही निघून जात असल्याने, कागदाबरोबरच विविध कलात्मक निर्मितीसाठीही तिचा वापर केला जातो. काही ठिकाणी हरणांची लीद वाळवून, रंगवून त्याची कर्ण-आभूषणं देखील बनवली जातात!
प्राण्यांनी खाल्लेल्या व मलावाटे बाहेर टाकल्या गेलेल्या कॉफीच्या बियांपासून तयार केलेली विशिष्ट स्वादाची अनेक पेये लोकप्रिय होऊ लागली आहेत. मार्जारकुळातील, प्रामुख्याने झाडावर राहणाऱ्या सिव्हेट नावाच्या प्राण्यांनी खाऊन विष्ठेवाटे बाहेर टाकलेल्या कॉफीच्या बियांपासून तयार केलेल्या कॉफी-पावडरची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, आज त्याची किंमत एका किलोला ७०० डॉलर (अंदाजे ५०,०००  रुपये) इतकी आहे. ह्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. पूर्वी, सिव्हेटनी उत्सर्जित केलेली कॉफीची ही फळे जंगलातून गोळा करून आणली जात तर आता त्यांना पाळीव प्राणी बनवून, कॉफीच्या फळांचा खुराक देऊन, ती गोळा केली जातात! एवढ्यावरच थांबेल तर तो माणूस कसला? आता हत्तीला कॉफीच्या बिया खायला घालून, त्यापासून ब्लॅक आयव्हरीनावाची कॉफी, तसेच बीयरचा प्रकार बनवला जाऊ लागला आहे. चीनमध्ये तर सुरवंटाच्या मलाचा वापर करून औषधीचहा बनवला जातो!      
शेणाबरोबरच मूत्र ह्या जैविक घटकाच्या जगभरात होणाऱ्या अनेकविध उपयोगांची माहितीही लेखात मिळते : मग ती हजारो वर्षांपूर्वी तोफांसाठी दारूगोळा बनवण्याची असो; वा चर्म-उद्योगात कातडी कमावण्यासाठी केल्या जाणाऱ्या वापराविषयाची. मूत्रातील यूरिया ह्या घटकाचे काही कालावधीनंतर विघटन होऊन अमोनिया तयार होत असल्याने, लोकर साफ करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. सोने शुद्ध करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून त्याचा वापर जरी अयशस्वी झाला; तरी त्यातूनच पुढे १६६९ साली फॉस्फरस ह्या घटकाचा शोध लागला. गोमूत्राचे तर अनेक उपयोग भारतीयांना ज्ञात आहेत. ‘इंडियन यलोनावाचे दुर्मीळ रंगद्रव्य बनवण्यासाठी १८ व्या शतकात गोमूत्राचा वापर केला जायचा ह्या दाव्याबाबतही जगभरात बराच खल झाल्याचा उल्लेख ते करतात.
शेणाच्या सर्वांत महत्त्वाच्या शास्त्रीय उपयोगितेबाबत सांगताना जोन्स शेणकिड्यांचे महत्त्व अधोरेखित करतात. ह्या किड्यांनी गोळा केलेल्या विष्ठेच्या पृथ:करणातून एकांतात राहणार्या हिमबिबट्यांपासून, ते लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या जावातील गेंड्यांपर्यंत अनेक प्रजातींच्या अस्तित्वाविषयी अभ्यासकांना महत्त्वाचे पुरावे उपलब्ध होतात.
सजीवांच्या मल-मूत्राच्या गुपितांचा शोध घेणाऱ्या ह्या मुलखावेगळ्या वल्लीच्या प्रयत्नातून नैसर्गिक विधीकडे बघण्याचा आपला दृष्टिको अधिक सकारात्मक होतो हे मात्र निश्चित.


                                                                                                                   -  अजित बर्जे
(गतिमान संतुलन - फेब्रुवारी २०१९ - साभार)

Comments

Popular posts from this blog

ऑल इज नॉट वेल...

धोक्यातील बेटं

माणसाने माणसाशी माणसा सम वागणे!